नागोठणे : अनेक वर्षे रुंदीकरणाचे काम चालू आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाकणच्या पेट्रोल पंपासमोर असणारा रस्ता उखडलेला असल्याने वाहने खड्ड्यातूनच न्यावी लागत असतात. संबंधित ठेकेदाराने नागोठणे विभागातील महामार्गाच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा मनसेचे नेते गोवर्धन पोलसानी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे रोहे तालुका उपाध्यक्ष हरिश्चंद्र तेलंगे यांनी दिला. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, वरिष्ठ अधिकारीच उपस्थित नसल्याने कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर अंतराच्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे चालू आहे. मार्गात अनेक ठिकाणी अर्धवट अशीच कामे केली असल्याने केलेले रस्ते पुन्हा उखडत असतात व परिस्थिती जैसे थे होत असते. महामार्गाच्या कामासाठी जनतेचाच पैसे वापरला जात असल्यामुळे जनतेला सुविधा देण्याचे स्वामित्व सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या संबंधित ठेकेदार कंपनीकडे जाते. रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच जर अशी परिस्थिती उद्भवत असेल, तर महामार्ग पूर्णपणे वाहतुकीस खुला झाल्यानंतर भविष्यात काय परिस्थिती असेल हे दिसून येत असल्याचे तेलंगे यांचे म्हणणे आहे. महामार्गाच्या संदर्भात कोठेही हयगय झालेली सहन करणार नसून ठेकेदार कंपनीने महामार्ग सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. १५ दिवसांत रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला असल्याचे तेलंगे यांनी सांगितले. (वार्ताहर)
महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी
By admin | Published: April 07, 2017 2:23 AM