सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील ४७ कामगारांना दत्त इंडिया कंपनीने सेवेत घेतले नाही. तसेच संघटनेवर घातलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत यासह २० मागण्यांसाठी वसंतदादा कारखान्यातील सर्व कामगार दि. २५ डिसेंबरपासून कारखाना गेटसमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती साखर कामगार युनियन (इंटक) चे जनरल सेके्रटरी प्रदीप शिंदे यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, वसंतदादा कारखाना खासगी कंपनीस चालविण्यास देण्यासह विविध घडामोडींत एक पाऊल मागे घेऊन कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाला सहकार्य केले, तरीही कामगारांचा छळ चालूच आहे. म्हणूनच आंदोलनाचे रणशिंग फुंकावे लागले आहे. संघटनेवर नाहक गुन्हे दाखल केले असून, ते सर्व मागे घेण्याची आमची मागणी आहे. दि. १ जुलै २०१७ पासून ५३ कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. या कर्मचाºयांना ग्रॅच्युईटीची रक्कम त्वरित मिळाली पाहिजे. सेवेतील ४७ कामगारांना दत्त इंडिया कंपनीने सेवेतच घेतले नसल्यामुळे त्या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. या कामगारांना त्वरित कामावर घेतले पाहिजे. कारखान्याकडील सेवेत असणाºया कर्मचाºयांचे सप्टेंबर ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीतील पगार मिळाला पाहिजे. वारंवार मागणी करूनही तो पगार दिला जात नाही. कारखान्याकडे कर्मचाºयांची थकीत रकमा असून, त्या देण्याचे दत्त इंडिया कंपनीने मान्य करूनही देण्यास टाळाटाळ होत आहे. कर्मचाºयांनी गरज म्हणून कमी पगारावरही काम करण्याची तयारी दर्शविली आहे. एवढे सहकार्य करुनही कारखाना व्यवस्थापनाकडून कामगारांचा मानसिक छळ केला जात आहे. व्यवस्थित बोलले जात नाही. कारखान्याचा काटा बंद पाडला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गुन्हा दाखल केला साखर कामगार युनियनच्या पदाधिकाºयांवर. अशापध्दतीने प्रत्येकाचा छळ कारखाना पदाधिकाºयांकडून चालू आहे, असा आरोप प्रदीप शिंदे यांनी केला. कारखाना प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी दि. २५ डिसेंबरपासून कारखाना गेटसमोरच बेमुदत उपोषणाला बसणार आहे. यातूनही तोडगा निघाला नाही, तर दि. १ जानेवारीपासून सर्व कामगार बेमुदत संपावर जातील, असा इशाराही त्यांनी दिला.कामगारांना गुलामगिरीप्रमाणे वागणूककामगारांच्या घामावर कारखाना उभा राहिला असतानाही सध्या वसंतदादा कारखान्याचे पदाधिकारी व कंपनीचे अधिकारी कामगारांना गुलामगिरीप्रमाणे वागणूक देत आहेत. कामगारांचा होणारा छळ आम्ही कदापी सहन करणार नाही, असा इशाराही प्रदीप शिंदे यांनी दिला.
‘वसंतदादा’च्या कामगारांचा एल्गार,उद्यापासून बेमुदत उपोषण, ४७ कामगारांना सेवेत घेण्यासह गुन्हे मागे घेण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 2:47 PM