मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या हेमंत पाटील यांनी आता सरकारला थेट मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. न्यायालयीन लढाईतही सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत १५ मे रोजी १०० कार्यकर्त्यांसह आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले, धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे म्हणून आतापर्यंत छोटी-मोठी मिळून तब्बल २२४ आंदोलने केली. अनेक वेळा पोलिसी खाकीचा वापर करून सरकारने आंदोलकांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्नही केला. मात्र, विरोधी बाकावर असताना फक्त १५ दिवसांत आरक्षण देण्याचा दावा करणारे सत्तेवर येऊन चार वर्षे लोटली तरी अद्याप आरक्षणाची अंमलबजावणी करू शकलेले नाहीत. याउलट सर्वपक्षीय नेत्यांकडून धनगर आरक्षणाचे राजकारणच सुरू असल्याचा आरोप पाटील यांनीकेला आहे.या आंदोलनात पाटील यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्ते मंत्रालयात घुसून आत्मदहन करतील, तर उरलेले कार्यकर्ते या प्रश्नावरून राज्यभरात रान पेटवतील, असे पाटील यांच्या भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने जाहीर केले.प्रत्येक अधिवेशनात आंदोलन केल्यानंतर फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळे १५ मेआधी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेत ‘धनगड’ऐवजी धनगर शब्द झाल्याची दुरुस्ती करावी.तसेच तशी शिफारस करणारा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा, असे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाटील यांनी पाठवले आहे.अन्यथा आरपारची लढाई करण्याचा निर्धार करत कार्यकर्त्यांसह आत्मदहन करू, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
धनगर आरक्षणासाठी आत्मदहन करणार, याचिकाकर्त्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 6:35 AM