ऑनलाइन लोकमतखामगाव, (जि.बुलडाणा), दि. 28 - येथील कलाकृतीला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात मोठी मागणी असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. भव्य आणि आकर्षकपणामुळे गणपती, देवी तसेच विविध देवी देवतांच्या मूर्तींना मोठी मागणी आहे.
खामगाव येथील मूर्तीकार गजानन तायडे गेल्या १५ वर्षांपासून विविध देवी देवतांच्या मूर्ती घडवित आहेत. यामध्ये आतापर्यंत त्यांनी औरंगाबाद, अकोला, अमरावती नजीकच्या शहरासोबतच भुसावल, जळगाव जामोद आणि मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे मूर्ती तयार करून दिल्या आहेत. यावर्षी देखील त्यांना विविध नवरात्रोत्सव मंडळाकडून मूर्तीसाठी मागणी आली असून, बऱ्हाणपूर, अकोला आणि जळगाव खांदेश येथे भव्य मूर्ती पाठविण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे.
आतापर्यंत भव्य मूर्ती केवळ मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्येच घडविण्यात येत होत्या. मात्र कलावंत हा कोठेही असू शकतो. खामगावसारखे तालुक्याचे ठिकाण सुध्दा या कलावंतामुळे नावारुपाला येत आहे. गत काही वर्षांपासून त्यांनी मागणीप्रमाणे ५० ते १०० फूट उंच मूर्ती घडविणे सुरु केले आहे. हवी त्या रुपात मूर्ती घडविण्यात त्यांचा हातखंडा झाला आहे. केवळ मूर्ती घडविणेच नाही तर त्यामध्ये जीवंतपणा ओतण्याचे काम गजानन तायडे करतात. अशा कलावंतामुळे खामगावची ओळख परराज्यात पोहोचली आहे.