पिंपरी : शहरातील अनधिकृत बांधकामातून महिलांची स्वच्छतागृहे काही नागरिकांनी बांधकाम करताना फसवून गिळंकृत केली आहेत. स्वच्छतागृहांच्या जागेवर अनधिकृत बांधकामांची उभारणी केलेली आहे, अशा नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी लोकशाही संस्था, महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष अजय लोंढे यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. ‘लोकमत’ने महिला स्वच्छतागृहांची मालिका प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांअभावी महिलांची होणारी कुचंबणा, तसेच स्वच्छतागृहांची दुरवस्था, आरोग्यावर होणारा घातक परिणाम, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष व विविध क्षेत्रांतील महिलांची परिचर्चा घेतली होती. त्याचा पाठपुरावा करून कारवाई करण्याची मागणी लोकशाही संस्थेने आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, महापालिकेने स्वखर्चातून शहरातील अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे उभारली. स्वच्छतागृहात सेवा सुविधा दिल्या. मात्र जनतेच्या करातून वसूल केलेला पैसा महापालिकेने वाया घालवला आहे. महापालिकेकडे किती स्वच्छतागृहे आहेत. ती किती आहेत व कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती उपलब्ध नाही. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे स्वच्छतागृहांची आकडेवारी उपलब्ध नाही. स्वच्छतागृहांवरही अधिकाऱ्यांनी संगनमत करून लुबाडणूक केली आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहांवर अनधिकृत बांधकामे उभारली गेली. त्याकडेही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर असताना त्याकडे कानाडोळा केला जात आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ स्वच्छतागृहांच्या चौकशीची मागणी
By admin | Published: May 17, 2016 2:34 AM