२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक गुरुवार आणि शुक्रवारी मुंबईमध्ये होत आहे या बैठकीसाठी काँग्रेससह देशातील बहुतांश भाजपाविरोधी पक्षांचे नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत असून, येथे उपस्थित असलेल्या नेत्यांच्या सरबराईची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रँट हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या सरबराईवरून मनसेनेमहाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे.
मनसेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यात अमेय खोपकर म्हणतात, राज्यात गेल्या ३ आठवड्यांपासून पाऊस गडप झाला आहे. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होत आहे. महाविकास आघाडीचे नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत आहेत. मात्र दुसरीकडे I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठत आहेत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही. सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, याचा मला अभिमान आहे, असा टोला अमेय खोपकर यांनी लगावला आहे.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आज विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल होणार आहेत. प्रसारमाध्यमांतून येत असलेल्या माहितीनुसार या नेत्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रात्री स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे.या स्नेहभोजनामध्ये मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल असणार आहे. तसेच नाश्ता, न्याहरीसाठी बाकरवडी, नारळवडी, वडापाव असे पदार्थ असतील. तर स्वीट डिश म्हणून नारळाची करंजी, दुधी मावा मोदक, पुरणपोळी असे पदार्थ असतील, असे सांगण्यात येत आहे.