ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - शिवाजी, एनथिरन, लिंगा, कबाली असे एकाहून एक सुपरहिट सिनेमे देणारे दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव करावा अशी मागणी धुळयाचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी आज विधानसभेत केली.
रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असून, १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरुतील मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. रजनीकांत घरात मराठी भाषा बोलायचे आणि बाहेर कन्नड भाषेमध्ये संवाद साधायचे.
महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या रजनीकांत यांनी दक्षिणेत प्रचंड यश मिळवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करावा अशी मागणी आमदार गोटे यांनी विधानसभेत केली. त्यांनी औचित्याचा मुद्याव्दारे ही मागणी केली.
तामिळनाडूत रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग असून, त्यांच्या कबाली सिनेमा प्रदर्शनाच्यावेळी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना सुट्टी जाहीर केली होती. लता मंगेशकर, विजय भटकर, सचिन तेंडुलकर, रतन टाटा, बाबासाहेब पुरंदरे अशा मान्यवरांचा या पुरस्काराने आतापर्यंत सन्मान करण्यात आला आहे.