सासवड : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांसाठी आतापर्यंत विविध मार्गाने आंदोलने झाली आहेत. तसेच मूक मोर्चाद्वारे लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जमवून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढे करूनही शासनाला अद्याप पाझर फुटलेला नाही. त्यामुळे राज्यातील मराठा समाजामध्ये दिवसेंदिवस अस्वस्थता पसरत चालली आहे.फुरसुंगी (हडपसर) येथील बापूराव गुंड यांनी आता याच मागण्यांसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनास जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी हडपसरपासून उलटा पायी प्रवास करण्याचा निर्धार केला असून हडपसर ते पंढरपूर आणि त्यानंतर तुळजापूर असा प्रवास सुरू केला आहे.शुक्रवारी (दि. ६) पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि तांबडी जोगेश्वरीदेवीचे दर्शन करून या आंदोलनास प्रारंभ केला आहे.शनिवारी (दि. ७) सासवड येथे आल्यानंतर या वेळी पुणे जिल्हा क्रांती मोर्चा शाखा पुरंदर तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप, पुरंदर तालुकाध्यक्ष गणेश मुळीक, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष पोपटराव जगताप, विराज जगताप, रमेश जगताप, तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनकर्ते बापूराव गुंड यांच्याबरोबर नंदुबापू हरपळे, हिरामण हरपळे, सुनील साळवे, सोमनाथ पवार, साधू कटके यासाठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनीही आंदोलनात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला असून त्यांच्याबरोबर पायी प्रवास करीत आहेत. (वार्ताहर)
मराठ्यांच्या मागण्यांसाठी ३६५ किलोमीटर ‘ते’ उलटे चालणार!
By admin | Published: January 09, 2017 2:23 AM