ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 30 - सहा महिन्यापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या रवींद्र माने (वय ३३, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या गुंडाचा पाठलाग करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. माधवनगर रस्त्यावरील कलानगर येथील दत्त मंदिराजवळ रविवारी भरदिवसा अडीच वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. संशयित हल्लेखोरांनी कोयत्याने डोके ठेचल्याने रवींद्र काहीक्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा मित्र भोराप्पा शिवाजी आमटे (२४, अहिल्यानगर) याच्यावरही संशयितांनी हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा चार हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत.
मारामारी, दहशत माजविणे असे दोन गुन्हे रवींद्रविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी त्याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिका-यांना सादर केला होता. प्रांताधिका-यांनी त्याला सहा महिन्यापूर्वी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. २८ मार्च २०१७ रोजी तो पुन्हा शहरात आश्रयाला आला असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला पकडले होते. त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला पुन्हा सांगली जिल्ह्यातून बाहेर सोडले होते. गुढीपाडव्यालाही तो गुढी उभा करण्यासाठी घरी आला होता. पण पुन्हा तो लगेच निघून गेला होता. रविवारी त्याचा भाऊ राहुल याचा वाढदिवस होता. यानिमित्त भावाची अहिल्यानगरमध्ये पोस्टर लावण्यात आली होती. वाढदिवस मोठा साजरा करायचा असल्याने रवींद्र सकाळी अकरा वाजता आला होता.
भावाच्या वाढदिवसाला मंडप उभा करण्यासाठी रवींद्र दुपारी एक वाजता पाच मित्रांसोबत घेऊन साखर कारखान्यावरील कामगार भवनमध्ये गेला होता. तिथे तो मंडप ठरविणार होता. मात्र मंडप मालकाने मंडप शिल्लक नसल्याचे सांगितले. तेथून तो मित्रांना घेऊन जुना बुधगावरस्तामार्गे कलानगर येथील माळी मंडप यांच्याकडे गेला होता. तिथे त्यांना मंडप, डेकोरेशन व ध्वनीक्षेपक यंत्रणा ठरविली. मंडपाचे साहित्य टेम्पोत भरुन ते अहिल्यानगरला जाण्यासाठी चिंतामणीनगर पुलाकडे येत होते. त्यांच्या पुढे मंडपाचे साहित्य भरलेला टेम्पो होता. रवींद्र व त्याच्या मित्र तीन दुचाकीवर होते. दत्त मंदिरजवळ आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने रवींद्रच्या दुचाकीला (क्र. एमएच १० बीएफ ८१०३) जोराची धडक दिली. रवींद्र पाठीमागे बसला होता, तर त्याचा मित्र भोराप्पा आमटे दुचाकी चालवित होता.
मोटारीची धडक बसल्याने रवींद्र व भोराप्पा दुचाकीवरुन उडून रस्त्याकडेला एका रिकाम्या प्लॉटमध्ये पडले. त्यानंतर धडक देणा-या मोटारीतून चार ते पाच संशयित उतरले. त्यांनी रवींद्रला टार्गेट करुन त्याच्यावत सत्तूरने हल्ला चढविला. हा प्रकार पाहून त्याचे पाचही मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने यातील चौघांनी पलायन केले; तर भोराप्पा आमटे त्यांच्या तावडीत सापडला. त्याच्यावरही सत्तूरने हल्ला केला. रवींद्रच्या डोक्यात तीन घाव घातले. तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर संशयितांनी मोटारीतून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, निरीक्षक अनिल गुजर यांनी घटनास्थळी भेट दिली. हत्येचे वृत्त वा-यासारखे पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
डोक्याचा चेंदामेंदा
रवींद्रच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूचा चेंदामेंदा झाला होता. तीस सेंटीमीरटचा एक मोठा घाव बसल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. अन्य दोन घाव दहा व सतरा सेंटीमीटरचे आहेत. गळ्यावर एकच लहान घाव आहे. मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. जखमी भोराप्पा आमटे यालाही उपचारार्थ दाखल केले आहे. त्याचा पोलिसांनी रात्री उशिरा जबाब नोंदवून घेतला.
‘नाजूक’ अन्...‘टिप’चा संशय
शहर पोलिसांच्या तपासात रात्री उशिरा मुख्य संशयित बाळू उर्फ बाळ्या शिंदे, म्हाळू यांच्यासह चार हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुंडाविरोधी पथके विविध भागात रवाना करण्यात आले आहेत. २८ मार्चला गुंडाविरोधी पथकाने रवींद्रला अटक केली होती. तो सांगलीत आल्याची ‘टिप’ पथकाला बाळू शिंदे याने दिल्याचा संशय रवींद्रला होता. यातून या दोघांत जोरदार वादही झाला होता. या वादातून त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. यातूनच बाळूने साथीदारांच्या मदतीने रवींद्रवर पाळत ठेवून खून केल्याचा संशय आहे. तसेच या खुनामागे ‘नाजूक’ कारणही असण्याची शक्यता आहे. त्याद्दष्टिने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. परंतु रात्री उशिरापर्यंत ठोस कोणतेही कारण पुढे आले नव्हते.