मुंबई : भाजपाकडून सरकारविरोधी बातम्या देणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांचा गळा दाबण्याचे काम सुरू आहे. मध्यंतरी एका वाहिनीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. आता सामना पेपरवर बंदी घालण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. अशा प्रकारे माध्यमांवर बंधने घालून भाजपा लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार टीका केली. मुंबईत भाजपाने वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांमध्ये प्रकाशकाचे नाव न टाकताच जाहिराती देत आहे. जाहिरातीत प्रकाशकाच्या नावाचा उल्लेख नसणे हा कायद्याचा भंग आहे. भाजपाने आतापर्यंत ५०० कोटींहून अधिक पैसा खर्च केला आहे. एका पक्षाला मुंबईतील २२७ उमेदवारांसाठी २२ कोटी ७० लाख खर्च करण्याची मर्यादा आहे. त्यामुळे भाजपाने उधळलेले ५०० कोटी भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या नावावर लावण्यात यावेत, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. उद्धव ठाकरे यांना आता सरकारचा पाठिंबा काढून घेण्यास भीती वाटत असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पाठिंबा काढून घ्यावा. आम्ही मध्यावधी निवडणुकीला तयार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘सामना’वर बंदी ही लोकशाहीची हत्या - मलिक
By admin | Published: February 17, 2017 3:06 AM