- धनंजय वाखारे, नाशिकमागील महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सारी सूत्रे जेथून हलविली गेली...जेथून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द अंतिम मानला गेला... तो मुंबई - आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्म आता २०१७ च्या निवडणुकीत पुरता सुनासुना आहे. त्याऐवजी, भुजबळ यांच्याच प्रयत्नांतून उभे राहिलेले राष्ट्रवादी भवन आता निवडणुकीचे मुख्य केंद्र बनले आहे. दोलायमान स्थितीत असलेल्या राष्ट्रवादीला भुजबळांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.नाशिक महापालिकेत १९९२ पासून आजवर झालेल्या पाचही निवडणुकांत नाशिकचे भूमिपुत्र व राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नेतृत्व कायम राहिले. भुजबळ सांगतील तोच शब्द प्रमाण मानत नाशकात आधी शिवसेनेची नंतर राष्ट्रवादीची वाटचाल सुरू राहिली. २०१२ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीची सारी सूत्रे छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे होती. मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्म हेच पक्षाचे केंद्र असायचे. भुजबळ बंगल्यावरून आलेला निरोप हाच अंतिम मानला जायचा. पक्षाच्या बैठकाही बंगल्यावर व्हायच्या आणि अेबी फार्मचेही वितरण येथूनच व्हायचे.मात्र, गेल्या १०-११ महिन्यांपासून छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर हे दोघेही विविध आरोपांमुळे आर्थररोड तुरुंगात आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी विविध आरोपांमुळे पक्षाची मलिन झालेली प्रतिमा पाहून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या आहेत.आव्हाड यांच्याकडे सूत्रे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रथमच भुजबळ यांच्याविना लढल्या जात आहेत. जिल्हा परिषदेत गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी म्हणजेच भुजबळ समर्थकांचा वरचष्मा राहिला. आता जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या आ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आलेली आहेत.
नाशिकच्या फडात भुजबळ फार्ममध्ये सन्नाटा
By admin | Published: January 15, 2017 3:21 AM