नवी मुंबई : आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांप्रति केलेल्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडतर्फे तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. त्याकरिता वाशी रेल्वेस्थानकाबाहेर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी आमदार परिचारक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे.पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिक व त्यांच्या पत्नी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. त्यानुसार संभाजी ब्रिगेडच्या वतीनेही परिचारक यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. रविवारी वाशी रेल्वेस्थानकाबाहेर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने जमून हा निषेध नोंदवला. आमदार परिचारक यांनी सैनिकांप्रति केलेले वक्तव्य अशोभनीय असून त्यांच्या वक्तव्याने सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसह भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे परिचारक यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी वाशी पोलिसांकडे अर्जाद्वारे करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबई अध्यक्ष सचिन सावंत-देसाई यांनी सांगितले. याकरिता रविवारी वाशी रेल्वेस्थानकाबाहेर परिचारक यांचा निषेध करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील काही दिवसांमध्ये शहरातील प्रत्येक रेल्वेस्थानकांच्या बाहेर परिचारक यांच्याविरोधात निदर्शने केली जाणार आहेत. तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने परिचारक यांच्या विरोधातले हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने राज्यभर निषेध मोर्चे काढले जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
परिचारकांच्या विरोधात निदर्शने
By admin | Published: February 27, 2017 2:28 AM