मुंबई - धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी आझाद मैदानात धनगर समाजातील महिलांनी एक दिवसीय उपोषण करत निदर्शने केली. यावेळी आरक्षण मार्गदर्शन मेळावाही घेण्यात आला.आझाद मैदानात करण्यात आलेल्या निदर्शनावेळी अहिल्याक्रांती प्रतिष्ठान प्रेरित क्रांती सेनेने सरकारला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. तसेच शासनाने बोलावलेली भेट नाकारत या प्रकरणी निर्णय जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीत याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी आरक्षणासाठी पुणे ते मुंबई दिंडी काढणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.याआधी पुणे ते मुंबई अहिल्यादेवी दिंडी काढण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. त्याअनुषंगाने आदिवासी विकास मंत्री यांनी दिंडी काढणाºया संघटनांना चर्चेसाठी बोलावले. मात्र सुमारे अर्धा तास चर्चा झाल्यानंतरही या प्रकरणी तोडगा निघू शकला नाही. पाटील म्हणाले, मंत्री महोदयांनी टिसचा सकारात्मक अहवाल लवकरच सादर करण्याचे आश्वासन दिले. तसेच दिंडी न काढण्याचे आवाहन केले. मात्र आता आश्वासन नको, तर निर्णय हवा आहे. धनगर समाजाचा सरकारवर विश्वास आहे. मात्र येत्या चार दिवसांत निर्णय जाहीर न झाल्यास १२ मार्च रोजी पुण्याहून दिंडी निघेल. त्यानंंतर धनगर समाज मोठ्या संख्येने १४ मार्चला मंत्रालयावर धडक देईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
धनगर आरक्षणासाठी निदर्शने,पुणे ते मुंबई दिंडी काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 4:54 AM