मुंबई : राज्यात डॉक्टर संरक्षण कायदा लागू असूनही निवासी डॉक्टर आजही असुरक्षितच आहेत. अनेकदा सरकार, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही यावर तोडगा निघत नाही. यामुळेच सोमवारपासून नागपूर मार्डने शांततेत निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. आठवड्यानंतर राज्यव्यापी मास बंक इशारा मार्डने दिला आहे. सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले की चर्चा, निदर्शने करूनही निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांनी हल्ले करण्याच्या घटना कमी होत नाहीत. नागपुरात गेल्या एका वर्षात तीनदा निवासी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. यासाठी नागपूर मार्ड आठवडाभर शांततेत निदर्शने करणार आहे. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयातील सुरक्षा वाढविणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे असे उपाय केले पाहिजेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी २५ मे रोजी चर्चा झाली होती. यावेळी त्यांनी सुरक्षेच्या प्रश्नाची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. ते अजूनही लेखी स्वरूपात मिळालेले नाही. येत्या सात दिवसांत आम्हाला लिखित स्वरूपात मागण्या मान्य झाल्याचे मिळाले नाही, तर राज्यभर निवासी डॉक्टर मास बंक करतील, असा इशारा दिला आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून सात दिवस शांततेत आंदोलन करीत असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले. एखादा रुग्ण अत्यवस्थ असताना, त्याला बरे करण्यासाठी डॉक्टर नेहमीच शर्थीचे प्रयत्न करतात. काही वेळा रुग्णाचे शरीर औषधांना प्रतिसाद देत नाही. यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. पण अशावेळी नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करून राग व्यक्त करतात. अनेक ठिकाणी डॉक्टरला मारहाण झाल्यावर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून घेतला जात नाही. कारण इतर ठिकाणाहून दबाव टाकला जातो. मग अशावेळी अनेक निवासी डॉक्टर पोलीस ठाण्यात धडकतात, तेव्हा एफआयआर नोंदवून घेतला जातो. हे वारंवार घडत असूनही सरकार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मार्डचे म्हणणे आहे.
आठवडाभर करणार निदर्शने
By admin | Published: June 09, 2015 4:13 AM