मुंबई : हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला याला आत्महत्या करण्यास प्रवृत करणाऱ्या हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू आणि केंद्रीय मंत्री यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी मुंबई विद्यापीठाचा कलिना कॅम्पस दणाणून सोडला. विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन कुलसचिव एम.ए. खान यांना दिले.मुंबई विद्यापीठ विद्यार्थी फ्रंट या संघटनेने रोहित वेमुला याच्या आत्महत्येविरोधात निदर्शने आयोजित केली होती; तसेच मुंबई विद्यापीठ बंदची हाक दिली होती. सकाळी विद्यार्थ्यांनी कलिना कॅम्पसमधील प्रत्येक विभागात जाऊन विद्यापीठ बंदचे आवाहन केले. तसेच व्याख्याने घेऊ नयेत अशी मागणी प्राध्यापकांना केली. छात्रभारती, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, विद्रोही सांस्कृतिक मंच, विद्यार्थी भारती, राष्ट्रसेवा दल, अंनिस अशा विविध संघटनांनी एकत्रित येत विद्यापीठ बंदची हाक दिली होती. विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन विद्यापीठाचे कुलसचिव एम.ए. खान यांना दिले. त्यानंतर फ्रंटने निदर्शने संपल्याचे जाहीर केले. मुंबई विद्यापीठ विद्यार्थी फ्रंटच्या वतीने रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी नसलेल्या काही संघटनांनी विद्यापीठातील महात्मा फुले भवन येथे आयोजित ‘सत्यनारायण पूजे’ला विरोध दर्शवण्यासाठी निदर्शने केली. मुंबई युनिव्हर्सिटी स्टुडंट्स फ्रंटचा यात काहीही संबंध नसल्याचे, फ्रंटच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.>महात्मा फुले भवनातील सत्यनारायण पूजेत वादमुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील महात्मा फुले भवनामध्ये कर्मचारी संघटनेकडून शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण महापूजेवरून कर्मचारी आणि विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्या. या वेळी कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे विद्यापीठात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कलिना कॅम्पसमधील महात्मा फुले भवनात मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघातर्फे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. याबाबतची माहिती विद्यार्थी संघटनांना मिळताच काही विद्यार्थी येथे पोहोचले. मुंबई विद्यापीठ ही एक शैक्षणिक संस्था असून, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम बंद करण्यासाठी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना विनंती केली. परंतु विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे रूपांतर काही क्षणांतच वादात आणि नंतर धक्काबुकीत झाले. या वेळी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
निदर्शने!
By admin | Published: January 23, 2016 3:57 AM