शिरूर : येथील शासकीय विशेष मुलींचे वसतिगृहातील चार मुलींना डेंगीची लागण झाली असून, एक सिस्टर गेल्या आठ दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. एकीकडे ही समस्या असताना हे वसतिगृह चालवणाऱ्या ‘कर्मोलोदया’ या संस्थेला गेल्या दीड वर्षाचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. निधीअभावी १४ कर्मचाऱ्यांना दीड वर्षापासून पगार देता आला नसून, शासनाच्या या भूमिकेमुळे कर्मोलोदयाचे व्यवस्थापन हतबल झाले आहे.वसतिगृहात ५२ विशेष मुली असून, कर्मोलोदया ही एनजीओ या मुलींचे १९९७ पासून संगोपन करीत आहे. गेल्या तीन दिवसांत या मुलींपैकी चार मुलींना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्थेच्या एक सिस्टर विनया यांच्या मेंदूत ताप गेल्याने त्यादेखील गेल्या आठवड्यापासून आयसीयूमध्ये आहेत. या सिस्टर व मुली येथील मातोश्री मदनबाई माणिकचंद धारिवाल रुग्णालयात दाखल असून, हे रुग्णालय या सर्वांचा मोफत उपचार करीत आहे. मुलींसाठी तर स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, लागणाऱ्या मेडिसीनचा खर्च कर्मोलोदयाला करावा लागत आहे. मृत्यूशी झुंज देणारी सहकारी तसेच डेंगीची लागण झालेल्या मुली पाहून या वसतिगृहाच्या अधीक्षिका सिस्टर डोमीनी यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून आतातरी अनुदान द्या, अशी विनंती केली. मात्र, आश्वासनापलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही. ‘कर्मोलोदया’ या ५२ मुलींचे संगोपन अगदी आईवडिलांप्रमाणे करीत आहे. सर्व कर्मचारी या मुलींना जीव लावतात. मात्र, या कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना दीड वर्षांपासून पगार देता आला नाही. अशा परिस्थितीत एका कर्मचाऱ्याच्या (महिला) दोन बालकांना न्यूमोनिया झाला होता. संस्थेने मात्र या बालकांचा खर्च केला. मात्र, आता कशाकशाचा खर्च उचलायचा, असा प्रश्न संस्थेसमोर उभा ठाकला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते संजय पाचंगे यांना ‘कर्मोलोदया’च्या समस्येबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी जि. प. समाजकल्याण विभागाच्या प्रोबेशनल आॅफिसर मंजिरी देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही प्रशासकीय पद्धतीची उत्तरे दिली. दीड वर्षांपासून अनुदान का थकले, याचे उत्तर त्यांना देता आले नाही. (वार्ताहर)>वसतिगृह अपंग आयुक्तालयाच्या नियंत्रणात आल्यापासून सातत्याने अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत. सततच्या या समस्येमुळे ‘कर्मोलोदयाचे’ वरिष्ठ कार्यालय हे वसतिगृह सोडण्याच्या मनस्थितीत आहे. कर्मोलोदयाचे येथील प्रमुख तसेच सहकारी मुलींना सोडून जाऊशी वाटत नसल्याचे सांगतात़१९९७ पूर्वी या मुलींची अवस्था अतिशय वाईट होती. या संस्थेने वसतिगृह चालवण्यास घेतल्यापासून विश्वास बसणार नाही असा या मुलींत बदल घडवला आहे. अशात या संस्थेने हे वसतिगृह सोडून दिल्यास त्यांची अवस्था पूर्वीप्रमाणेच होईल.मुलींवर उपचार सुरू आहेत़ त्यांची काळजी घेतली जात असून माणुसकीच्या भावनेतून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे व्यवस्थापक अंबरीश सूर्यवंशी यांनी सांगितले.
‘कर्मोलोदया’च्या ४ मुलींना डेंगी
By admin | Published: August 25, 2016 1:39 AM