मुंबई : सप्टेंबर महिन्यात वाढीला लागलेल्या डेंग्यूने आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ३ बळी घेतले आहेत. केईएम रुग्णालयात रविवारी एका २२ वर्षाच्या मुलाचा तर मंगळवारी खासगी रुग्णालयात एका महिलेचा तसेच एका पुरुषाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृतांची संख्या आता ११ वर पोचली आहे. दरम्यान, केईएम रुग्णालयात तीन निवासी डॉक्टर डेंग्यूने आजारी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.एका खासगी रुग्णालयात निशा चव्हाण या महिलेचा मृत्यू झाला. तर श्रीपाद वायकर या आणखी एका डेंग्यू संशयिताचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. तर मंगळवारी एल्फिन्स्टन येथे राहणाऱ्या शुभम तिवारी याला ताप आल्याने शनिवारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा ताप कमीच होत नसल्यामुळे त्याला ३ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभमला रुग्णालयात दाखल केल्यावर त्रास व्हायला लागल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दिला जात होता. उपचार सुरू असूनही त्याची प्रकृती खालावली आणि रविवारी त्याचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी १२ वाजता नायर रुग्णालयामध्ये देखील एका रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. संदीप गायकवाड यांना १२ दिवसांपूर्वी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गायकवाड यांची पत्नी नायर रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. केईएममधील निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे हिचा २७ आॅक्टोबर रोजी डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. केईएम रुग्णालयाच्या वसतिगृहामध्ये डासांची पैदास झाल्याचे आढळून आले होते. डॉ. श्रुती हिची प्रकृती खालावल्यानंतर तिला हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले होते. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांमध्ये मिळून डेंग्यूचे एकूण ३४१ रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईत डेंग्यूचे ११ बळी
By admin | Published: November 05, 2014 4:27 AM