वरुड : तालुक्यातील संक्राजी पवनी येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा डेंग्यूमुळे नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारती वसंत उईके असे डेंग्यूमुळे मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती येथील पंचफुलाबाई पावडे महिला महाविद्यालयाची बी.ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. आठवडाभरापासून ताप आल्याने तिच्यावर वरुड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु ताप वाढतच गेल्याने तिला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान ७ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तिचा मृत्यू झाला. यामुळे तालुक्यात पुन्हा विषाणूजन्य आजारांचा फैलाव तर होणार नाही ना? अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता ? तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंदे्र असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर वरुडच्या ग्रामीण रुग्णालयातसुध्दा दोनच डॉक्टर असून तेच तालुक्यातून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करतात़ याकडे लोकप्रतिनिधींसह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. पवनीवासीयांची तळमळ मृत भारती उईके ही मोलमजुरी करुन शिक्षण घेत होती. ती वरुडच्या वसतिगृहात वास्तव्यास होती. अचानक आजारी पडल्याने पालकांनी तिला आधी राजुराबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर वरुडच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती खालावल्याने भारतीला नागपूरला हलविण्यात आले. मात्र, भारतीचा मृत्यू झाला.
डेंग्यूमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Published: August 08, 2014 1:04 AM