ठाणे : महापालिका डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करत असली तरी जानेवारी ते आॅक्टोबरदरम्यान शहरात डेंग्यूचे ६८ रुग्ण आढळले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात पाण्याच्या चार हजार ११४ नमुन्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. ३ हजार ६९३ घरांमध्ये डेंग्यूचे डास आढळले आहेत.मुंबई पाठोपाठ ठाण्यातही डेंग्यूने डोके वर काढले आहे. चार महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आता आरोग्य केंद्रामार्फत विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पाण्याचे नमुने आणि स्वच्छतेविषयी माहिती गोळा करण्याचे काम आरोग्य विभागाचे कर्मचारी करत आहेत. ठाण्यात गतवर्षी डेंग्यूचे केवळ १२ रुग्ण आढळले होते. परंतु यंदा त्यात वाढ झाली असून हा आकडा ६८ च्या घरात गेला आहे. पालिकेने युध्द पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. विटावा, खारेगाव, कळवा, रायलादेवी तसेच वर्तकनगरचा काही भाग, मुंब्रा या भागात डेंग्यूच्या अळ्या अधिक प्रमाणात आढळल्या आहेत. (प्रतिनिधी)
तीन हजार घरांत डेंग्यूचे डास
By admin | Published: November 05, 2014 4:27 AM