ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ -- मुंबईसह राज्यभरात डेंग्यूने थैमान घातले असतानाच डेंग्यू हा साधा आजार असून प्रसारमाध्यमांनी नाहक या आजाराला मोठे केले अशी मुक्ताफळे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी उधळली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात डेंग्यूने थैमान घातले आहे. मुंबईत डेंग्युमुळे आत्तापर्यंत सुमारे १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो रुग्णांवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. मुंबईतील डेंग्यूचा प्रश्न गंभीर रुप धारण करत असल्याने दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनी देखील महापालिका अधिका-यांसोबत चर्चा केली होती. मात्र मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी डेंग्यू हा साधा आजार असल्याचा जावईशोध लावला आहे. प्रसारमाध्यमांनी या आजाराविषयी भीती निर्माण करण्याऐवजी जनजागृती करावी असा सल्लाही त्यांनी दिला.
डेंग्यूचे रुग्ण वाढत असतानाच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवण्याचा आकडाही जास्त आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये डेंग्यूविषयी चुकीची आकडेवारी सादर केली जातेे असा दावाही त्यांनी केला आहे. स्नेहल आंबेकर यांच्या या वादग्रस्त विधानामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.