पुणे : राज्यात सध्या डेंग्यूने थैमान घातले आहे. मंगळवारी दिवसभरात जळगावात दोन तर लातूरमध्ये एक अशा तिघांचे बळी गेले, तर राज्यात हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापुरानंतर सावरणाऱ्या कोल्हापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याखालोखाल पुणे, ठाणे येथे लागण झाली आहे.महापूरग्रस्त कोल्हापूर विभागात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या १,६३० झाली असून, पुण्यात १३६२, ठाणे विभागात १३०३ रूग्ण आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत ६३९० जणांना डेंग्यूची लागण झाली, तर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
जळगाव शहरात यावर्षी ४५ रुग्ण आढळून आले आहेत. नंदुरबार शहरात २८ रुग्ण असून खासदार डॉ. हिना गावीत यांनाही डेंग्यू झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद शहरात सात बळी गेले १ आॅक्टोबरपासून आतापर्यंत ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
कशामुळे होते पैदास?
डेंग्यूचे डास घरात व आसपासच्या भागात साठवलेल्या स्वच्छ पाण्यात असतात. त्यामुळे महापूर वा दुष्काळ असला तरी पाणी साठवून ठेवण्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास होते. ग्रामीण भागाचेही शहरीकरण झाल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढते आहे, असे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.