ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - बकरी ईददरम्यान गोवंश हत्या व गोमांस विक्रीवरील बंदी मागे घ्यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. या संदर्भातील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारकडेच आहे असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
बकरी ईदरम्यान तीन दिवसांसाठी गोवंश हत्या व गोमांस विक्रीवरील बंदी मागे घ्यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली होती. या याचिकेवर सोमवारी न्या. अभय ओक यांच्यासमोर सुनावणी झाली. बकरी ईद दरम्यान अनेकांना बकरा विकत घेणे शक्य नसते, अशा वेळी परिसरातील काही लोक एकत्र येऊन बैल विकत घेतात व त्याचा बळी दिला जातो. त्यामुळे या तीन दिवसांसाठी गोहत्या बंदी शिथील करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. सोमवारी तब्बल साडे तीन तास यावर सुनावणी झाली. मात्र एवढ्या कमी काळात निर्णय घेणे अशक्य असल्याचे सांगत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली.