बदलापूर : जगद साई या तरुणाने समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने, राजेश नेपाळी याने त्याची हत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. राजेश याने त्याचा मित्र जगद साई याची हत्या करून, धड आणि मुंडके वेगळे केले होते. राजेशवर यापूर्वीही बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. राजेश हा कात्रप येथील जय मल्हार चायनीज दुकानात कुक म्हणून कामाला होता. राजेशने आपला मित्र जगद याला दुकानात बोलावले होते. ज्या दिवशी जगदची हत्या झाली, त्या दिवशी चायनीज दुकानाचा मालक, त्याचा वाहनचालक, राजेश आणि जगद दारू पिण्यास बसले होते. रात्री १२ वाजता दारू पिऊन झाल्यावर, मालक आणि वाहनचालक हे दोघे निघून गेले. दुकानात राजेश आणि जगद हे दोघेच होते. त्याच रात्री राजेश याने दारूच्या नशेत जगद याच्याकडे समलैंगिक संबंधाची मागणी केली होती, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. त्यास नकार दिल्यानेच, राजेशने जगदची हत्या करून त्याचे मुंडके वेगळे केले, असा पोलिसांचा अंदाज आहे.राजेश तपासादरम्यान योग्य माहिती देत नसल्याने, पोलिसांनी हत्येचे कारण अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. मात्र, तपासात समलैंगिक संबंध हेच कारण पुढे येत आहे. पोलिसांनी आरोपीचे जुने रेकॉर्ड काढले असता, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे समोर येत आहे. २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी असल्याने, त्या दरम्यान आरोपीकडून सर्व माहिती घेऊन हत्येचे कारण स्पष्ट केले जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राजभोज यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)व्हॉट्स अॅपमुळे त्वरित अटक हत्या करून पळून जाणाऱ्या राजेश नेपाळी या तरुणाला लागलीच अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीचे छायाचित्र भुसावळ येथील रेल्वे पोलिसांना व्हॉट्स अॅपवर पाठवत, त्याला लागलीच ताब्यात घेण्यात आले. राजेश हा नेपाळ येथील त्याच्या मूळ गावी रेल्वेने पळून जाण्याचा दाट संशय पोलिसांना होता. त्याने कल्याण रेल्वे स्थानकातून पुष्पक एक्स्प्रेस पकडली असेल व ती दुपारी ३च्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकात पोहोचेल, असाही अंदाज पोलिसांनी बांधला होता. त्यानुसार, अत्यंत कमी वेळेत राजेश नेपाळीची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी व्हॉट्स अॅपचा आधार घेतला. त्यानुसार, भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पकच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करणाऱ्या राजेशला ताब्यात घेतले.
समलैंगिक संबंधास नकार दिल्याने हत्या?
By admin | Published: March 19, 2017 2:01 AM