यदु जोशी / मुंबईशिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे प्रकाशन तीन दिवस थांबविण्याची भारतीय जनता पार्टीची मागणी राज्य निवडणूक आयोगाने आज फेटाळली. भाजपाच्या आरोपांबाबत ‘सामना’च्या प्रकाशकांकडून आयोगाने केवळ अभिप्राय मागविल्याने भाजपाला जोरदार दणका बसला आहे. भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी बुधवारी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र देऊन १६ तसेच २० आणि २१ फेब्रुवारी रोजी सामना प्रकाशित करण्यास बंदी आणावी अशी मागणी केली होती. ‘सामना’मध्ये शिवसेनेचा राजकीय फायदा होईल असा मजकूर छापला जात आहे. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून त्या बद्दल शिवसेना, सामनाचे संपादक यांच्यावर कारवाई करावी, संपूर्ण निवडणूक प्रचारकाळात सामनामध्ये छापलेला प्रचारकी मजकूर हा जाहिरातीचा भाग असल्याने तो शिवसेनेने निवडणूक खर्चात जोडलेला आहे की नाही याची चौकशी करावी आणि जोडलेला नसेल तर तो पेड न्यूज समजण्यात यावा, अशा तीन मागण्या श्वेता शालिनी यांनी निवेदनात केल्या होत्या. त्यावर आयोगाचे अध्यक्ष जे.एस.सहारिया यांनी आज केवळ दोन ओळींचे पत्र ‘सामना’चे प्रकाशक आणि संपादकांना दिले आणि वरील तीन मागण्यांबाबत त्यांचा अभिप्राय मागविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा अभिप्राय तीन दिवसांच्या आत म्हणजे १९ फेब्रुवारीपर्यंत देण्यास आयोगाने सांगितले आहे. भाजपाने ‘सामना’ंचे प्रकाशन तीन दिवस थांबविण्याची केलेली मागणी मान्य केली नसल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले. सामनाकडून अभिप्राय आल्यानंतर आयोग काय भूमिका घेते याकडे लक्ष असेल. विशेषत: २० आणि २१ फेब्रुवारीच्या अंकामध्ये प्रचारकी थाटाच्या बातम्या देण्यास आयोग सामनाला मनाई करणार की अभिप्राय बघून प्रकरण संपविले जाईल या बाबत उत्सुकता असेल.
‘सामना’चे प्रकाशन थांबविण्यास नकार
By admin | Published: February 17, 2017 3:02 AM