मुंबई : दिवाळीत आकाशात फ्लाइंग लॅण्टेन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. उडत्या दिव्यांमुळे आग लागून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. फटाक्यांच्या आवाजाच्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी स्पष्ट केले.
ऐन दिवाळीत पेटते दिवे, आकाशी पतंग,फ्लाइंग लॅण्टेन उडविले जातात. दूरवर जाऊन ते एखाद्या इमारत, घरावर पडण्याची शक्यता असते. गेल्या तीन वर्षांत यातून चार ठिकाणी आग लागण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये मोठय़ा हानीची शक्यता असल्याने त्याला बंदी घालण्यात यावी, अशी सूचना अग्निशमन दलाकडून पोलिसांना करण्यात आली. त्यानुसार येत्या १५ दिवसांसाठी फ्लाइंग लॅण्टेन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. असा प्रकार करणार्यावर मुंबई सीआरपी कायदा १८८ अन्वये कारवाई केली जाईल. गुन्हा दाखल झाल्यास संबंधिताला अटक किंवा त्यावर न्यायालयात खटला दाखल केला जाऊ शकतो, असे आयुक्त पडसलगीकर यांनी स्पष्ट केले.