मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राज्यात विभागनिहाय रणनीती आखली असून, प्रत्येक विभागासाठी देशातील बड्या नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मंगळवारी एकीकडे निवडणुकीची तारीख जाहीर होत असताना दुसरीकडे काँग्रेसने राज्यासाठी ११ निरीक्षकांची नावे जाहीर केली.
राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद लक्षात घेऊन हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रात फटका बसू नये म्हणून दिल्लीतूनच प्रत्येक विभागासाठी निरीक्षक नेमण्यात आल्याचे समजते.
मुंबई आणि कोकण विभागाची जबाबदारी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत आणि जी. परमेश्वरा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
विदर्भ विभागाची जबाबदारी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि उमंग सिंघर, मराठवाड्याची जबाबदारी राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट आणि उत्तम कुमार रेड्डी, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी टी. एस. सिंहदेव आणि एम. बी. पाटील, तर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सईद नासीर हुसेन आणि डी. अनसुया सीताक्का यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर वरिष्ठ निरीक्षक म्हणून मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.