ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. २२ : पाच ते सहा वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावावर निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ नांदेड येथील एका तरुणाने अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपाध्यक्ष तथा आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त एकनाथ भालेराव यांच्यावर शाई फेकली. ही खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी सिडकोतील सहआयुक्तांच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी सिडको पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
हणमंत मामीलवार (रा. देगलूर, जि.नांदेड) आणि गंगाधर जकुलवार (रा. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आदी आदिवासी समाजातील तरुणांनी औरंगाबादेतील सिडको येथे असलेल्या विभागीय अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पडताळणीचे प्रस्ताव पाच ते सहा वर्षापूर्वी सादर केलेले आहेत. या कार्यालयाकडे शेकडो प्रस्ताव विनानिर्णय धूळ खात पडून आहेत. यामुळे शेकडो बेरोजगार तरुणांची नोकरीची वयोमर्यादा निघून जात आहे. यामुळे हे तरुण अधूनमधून या कार्यालयात येऊन चौकशी करतात. कोळी महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हणमंत मामीलवार हे याबाबत पाठपुरावा करीत आहेत.
त्यांनी चार ते पाच महिन्यांपूर्वी विभागीय जात पडताळणी समितीला याविषयी निवेदन देऊन समाजातील विविध तरुणांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावावर निर्णय घेण्याची विनंती केली होती. दरम्यान गुरुवारी दुपारी मामीलवार आणि जकुलवार हे सहआयुक्त भालेराव यांच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी त्यांच्या प्रलंबित जात प्रमाणपत्र पडताळणीच्याफाईलीचे काय झाले, असे विचारले. तेव्हा या फाईलींवर अद्याप समितीने अद्याप निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांना सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद वाढत गेला आणि मामीलवार आणि जकुलवार यांनी अश्लील शिवीगाळ करीत सोबत आणलेल्या बाटलीतील शाई भालेराव यांच्या अंगावर फेकली. अनेक वर्षे प्रकरणे पडूनयाविषयी सचिन गोरे या विद्यार्थ्याने सांगितले की, सहा ते सात वर्षापासून समिती आमच्या जात प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेत नाही. आमचे प्रमाणपत्र वैध ठरवा अथवा अवैध; याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र निर्णयच घेतला जात नसल्याचे तरुणांमध्ये उद्रेक वाढत आहे. याप्रकरणी आता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.पोलिसांनी घेतले ताब्यातकार्यालयात वादावादी सुरू झाल्याचे कळताच सिडको ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती यांनी तात्काळ तेथे धाव घेतली. त्यांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, अंगावर शाई फेकणे, अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी दिली.