ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि.14 - २७ नोव्हेंबर रोजी आळंदी (पुणे) येथे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरीतून सोमवारी टाळ-मृदंगाच्या जयघोषात दुपारी १ वाजता श्री विठ्ठलाच्या पालखीचे आळंदीकडे प्रस्थान झाले. श्री विठ्ठल मंदिरातून देवाच्या पायावर पादूका ठेवून विधीवत पूजा, आरती करून प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी सोहळाधिपती विठ्ठल महाराज वासकर यांच्याकडे श्री विठ्ठलाच्या पादूका सुपूर्द केल्या.
मागील तीन वर्षापासून श्री विठ्ठलाच्या पादूका आळंदीला नेत तेथील ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात देवाला सहभागी करण्याची परंपरा रूढ झाली आहे. त्यानिमित्ताने आज पंढरीत दुपारी १२ वा. श्री विठ्ठल मंदिरातील मुख्य गाभाºयात ‘पादुका’ ठेवून प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, सोहळाधिपती माजी न्यायमूर्ती विठ्ठल महाराज वासकर व त्यांच्या सुविद्य पत्नी रेणुकाताई वासकर यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठलाच्या पादुका देवाच्या पायाजवळ ठेवून पूजा करण्यात आली व टाळ मृदंगाच्या जयघोषात या पादुका रावळामध्ये ठेवलेल्या पालखीत स्थानापन्न करण्यात आल्या.
श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून या पादुका आळंदीकडे मार्गस्थ झाल्या. या पालखी सोहळ्यामध्ये एकूण १२ दिंड्या सहभागी झाल्या असून पालखीपुढे १४ दिंड्या व पालखीमागे चार दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सुमारे १७ हजार वारकरी या पालखी सोहळ्यात दाखल झाले आहेत. महिलाही यावर्षी पहिल्यांदाच या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत.
या दिंडी सोहळ्यात सोहळाधिपती माजी न्यायमूर्ती विठ्ठल महाराज वासकर यांच्यासह नामदेव महाराज वासकर, एकनाथ महाराज वासकर, गोपाळ महाराज वासकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, गोपाळ महाराज देशमुख, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन सहभागी झाले आहेत. पालखी सोहळ्यात ह.भ.प. म्हातारबाबा देवस्थान, उखळीकर महाराज, देहू देवस्थान, पैठण देवस्थान, सोपानकाका देवस्थानच्या दिंड्या व त्यांचे प्रमुख सहभागी झाले आहेत. कर्नाटक राज्यासह महाराष्टÑातील अनेक वारकरी या पालखी सोहळ्यात दाखल झाले आहेत.
पंढरपुरातील चौफाळा येथे पालखी आल्यानंतर बैलगाडीच्या सजविलेल्या रथामध्ये पालखी ठेवण्यात आली. या दिंडी सोहळ्यात चार घोडे दाखल झाले असून सांगलीचे भक्त अनिल जाधव यांनी आपले माऊली व चेतक हे दोन घोडे सेवेत दिले आहेत. यातील एका घोड्यावर देवाची गादी तर दुसºया घोड्यावर दंडकधारी सेवक बसविलेला आहे. जयसिंह मोहिते-पाटील यांनीही प्रत्येकी एक-एक घोडा दिला असून या चार घोड्यांमुळे श्री विठ्ठलाच्या पालखी सोहळ्याची शोभा वाढली आहे.
२६ नोव्हेंबरला सोहळा आळंदीत दाखल होणार
मागील तीन वर्षापासून श्री विठ्ठलाचा पालखी सोहळा भक्तीभावाने श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी आळंदीला जात आहे. या पालखी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल मंदिर समितीकडून एक घोडा देण्यात येतो. शिवाय समितीचे कर्मचारीही असतात. वारकºयांच्या साहित्यासाठी एक ट्रक दिला असून भाविकांच्या सोयीसाठी प्रत्येक तालुक्याच्या कार्यक्षेत्रात पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. हा पालखी सोहळा २६ नोव्हेंबर रोजी आळंदी येथे पोहोचणार आहे.