पुणे : भागवत धर्माचा गजर करत भक्तीचा मळा फुलवित निघणारी आषाढी पायी वारीची वाट कोरोनाने अडविली असली तरी विठुरायाच्या चरणी संतांच्या पादुका अर्पण होण्याची शतकांची परंपरा कायम राहणार आहे. बसवर स्वार होऊन संतांच्या पालखी पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. येत्या मंगळवारी रस्त्यात कोठेही न थांबविता पालख्यांचे पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज आणि संत चांगावटेश्वर यांच्या पालख्या निघणार आहेत. वेगवेगळ्या बसद्वारे या पालख्या निघणार आहेत; मात्र सर्व पालख्यांचे मंगळवारी रात्री अकरा वाजेपर्यंत पंढरपुरात आगमन व्हावे, असे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक पालखीसोबत केवळ २० जणांनाच बसमधून जाता येणार आहे. रस्त्यात कोठेही दर्शनासाठी पालखी थांबविता येणार नाही.अशी निघणार पालखी : संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करुन पादूकांचा मार्ग निश्चित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. साठ वर्षांवरील वारकºयांना सोबत जाता येणार नाही. प्रत्येकाची कोरोना चाचणी आवश्यक आहे. बससोबत पुढे व मागे पोलीस बंदोबस्त असेल.