अरुणकुमार मेहत्रे,
कळंबोली- एसटी महामंडळाने ई-कार्यपद्धतीचा अवलंब करीत स्मार्ट कार्ड स्वरूपात पास उपलब्ध करून दिले आहेत. पनवेल बस आगारात सगळ्यात अगोदर प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा राबविण्यात आली होती. मात्र आता या योजनेचा बोजवारा उडाला आहे. पास अपडेट करणाऱ्या यंत्रणेत सातत्याने बिघाड होत आहे. याबाबत एसटीकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांना सातत्याने गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. महामंडळाचे २३ विभाग पेपरलेस करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्या दृष्टीने दोन वर्षांपूर्वी स्मार्ट पास योजना सुरू करण्यात आली. वेगवेगळ्या योजनांवरील पासेसच्या छपाईवर होणारा लाखोंचा खर्च यामुळे वाचला आहे. या यंत्रणेमुळे आता फक्त एका रजिस्टरवर स्मार्ट कार्डच्या पासची नोंद ठेवण्यात येत आहे. महामंडळातर्फेविद्यार्थी पास, अहिल्याबाई होळकर पास, आवडेल तेथे प्रवास पास दिले जातात. पनवेल परिसरातील १0 हजारांहून अधिक प्रवासी पासधारक आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बसमधील वाहकांकडे असलेल्या तिकीट तपासणी यंत्रातच सेंसर लावण्यात आले आहेत. प्रवाशाकडे असलेले स्मार्ट कार्ड वाहक त्या यंत्रातील सेंसरवर लावतो. त्याच वेळेस प्रवाशाचा संपूर्ण बायोडाटा, त्याला जायचे ठिकाण, कार्डाचा वैध कालावधी याची संपूर्ण माहिती त्या यंत्रातून मिळते. पूर्वी विद्यार्थ्यांना हाताने लिहून पास दिले जायचे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत स्मार्ट कार्ड देण्यात आले आहेत. ही यंत्रणा जरी फायदेशीर असली तरी आता ती पनवेल आगारात डोकेदुखी ठरत आहे.>पासधारकांचे हेलपाटे मशिनमध्ये बिघाड झाल्याने पासधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आपल्याकडील स्मार्ट कार्ड अपडेट करण्याकरिता दोन-तीन दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याचे महमंद शेख या पासधारकाने ‘लोकमत’ला सांगितले. तासन्तास रांगेत राहून सुध्दा आवडेल तिथे प्रवास या योजनेतील पास मिळाला नसल्याचे संजय घेवारे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सुध्दा पासकरिता दररोज फेऱ्या माराव्या लागत आहेत. एकीकडे एसटी खासगी बसविरोधात ओरड करीत असताना दुसरीकडे प्रवाशांना योग्य सुविधा दिल्या जात नाही.>टायमॅक्स मशिनमध्ये सातत्याने बिघाडपासधारकांचा पासाचा कालावधी संपल्यानंतर पैसे भरून स्मार्ट कार्ड पुन्हा टायमॅक्स मशिनव्दारे अपडेट केले जाते. त्यामध्ये पास कधीपासून कधीपर्यंत आहे ती तारीख असते. त्याचबरोबर इतर डाटा अपटेड केला जातो. मात्र या मशिनमध्ये सातत्याने बिघाड होत आहे. यात बॅटरी चार्ज न होणे, डिस्प्ले न दिसणे, रेंज न येणे, डाटा अपटेड न होणे अशा तक्र ारी येत आहेत. संबंधित कर्मचारी या प्रकारामुळे त्रस्त असून, एजन्सीकडून वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्याची त्यांची तक्रार आहे.टायमॅक्स मशिनमध्ये बिघाड होतो ही वस्तुस्थिती आहे. त्यानुसार आम्ही पर्यायी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहोत. त्याचबरोबर संबंधित एजन्सीला सुध्दा ही यंत्रणा सुरळीत चालावी याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत.- राजेंद्र परदेशी,वरिष्ठ आगार व्यवस्थापकपनवेल एसटी आगार