मुंबई : सिंहस्थ कुंंभमेळाव्यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याचे निर्देश त्यांनी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्राला (निरी) दिले. राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध प्रा. एच. एम. देसरडा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेबाबत न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याच अनुषंगाने गोदावरीच्या नदीच्या प्रदूषणाबाबत दाखल अन्य एका याचिकेचा संदर्भ देत राज्य सरकार व नाशिक महापालिकेने ते रोखण्यासाठी योग्य कार्यवाही न केल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. कुंभमेळ्याच्या कालावधीत गोदावरी नदी घाण झाल्याने ती स्वच्छ करण्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात कार्यकारी अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. मात्र, या पत्रावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. यावेळी खंडपीठाने नमूद केले की, राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिकेला वारंवार आदेश देऊन ‘निरी’च्या मदतीने गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुंंभमेळ्यामुळे पुन्हा पाणी घाण झाले आहे, त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने नदीची पाहणी करून उपाययोजना आखण्याचे निर्देश न्यायालयाने निरीला दिले. त्याचबरोबर यापुढे नदीच्या प्रदूषणात वाढ होऊ नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची सूचनाही न्यायालयाने केली. यावर पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)
कुंभामुळे गोदाप्रदूषणात वाढ
By admin | Published: October 30, 2015 1:20 AM