मुंबई : देशाची आगामी राजकीय दिशा स्पष्ट करणार्या निवडणुकीचा कौल उद्या (शुक्रवारी) लागणार असल्याने या दिवशी राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी खाकी वर्दीवाले सज्ज झाले आहेत़ महाराष्टÑातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीच्या ठिकाणांसह सर्व प्रमुख पक्षांची कार्यालये, उमेदवारांच्या निवासस्थानी विशेष बंदोबस्त नेमण्यात आला आहे. राज्यभरात एकूण दीड लाखावर पोलीस उद्या सकाळी ६ वाजल्यापासून तैनात राहणार असून आवश्यकतेनुसार त्यांच्या मदतीसाठी राज्य व केंंद्रीय राखीव दलाची तुकडी दिमतीला ठेवण्यात आली आहे. निकालानंतर उमेदवारांच्या समर्थकांमध्ये राडा होण्याची संभाव्य ठिकाणे निश्चित केली असून या ठिकाणांंवर रात्रीपासून पोलिसांनी पाळत ठेवली आहे. त्याचप्रमाणे चार दिवसांपूर्वी गडचिरोलीत झालेल्या नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त व नागपूर विभागामध्ये मतमोजणीच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात आला आहे. निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या निकालाबाबत उमेदवार व समर्थकांंमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे विविध वृत्तवाहिन्यांनी मतदानोत्तर वर्तवलेल्या अंदाजामध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येऊन कॉँग्रेस आघाडीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर निकाल स्पष्ट झाल्यानंतर काही ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये ‘राडा’ होण्याची शक्यता असल्याने विशेष दक्षता घेण्याच्या सूचना पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी पोलीस आयुक्त/अधीक्षकांना दिल्या आहेत. मतमोजणी केंद्र, पक्ष, उमेदवारांची कार्यालये व निवासस्थानी बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
राज्यात फौजफाटा तैनात
By admin | Published: May 16, 2014 3:04 AM