अलिबाग: रोहा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या तिघा समाजविघातक गुंडांवर एक वर्ष कालावधीकरिता रायगड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश रोह्याचे तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी सुभाष भागडे यांनी १६ सप्टेंबर रोजी रायगड जिल्हा पोलिसांना दिले आहेत. प्रत्यक्ष हद्दपारीची कार्यवाही रायगड पोलीस करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली .तिघा गुंडांमध्ये रोहा शहरातील खालचा मोहोल्ला परिसरात राहाणारा शारुख मजीद महाडकर, धनगर आळीत राहणारा राजेश प्रभाकर काफरे आणि वरसे गावांत राहाणारा ओमकार गुरव यांचा समावेश आहे. दंगे सदृश वर्तन व सहभाग अशा स्वरुपाचे विविध गुन्हे या तिघांवर रोहा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सुनावणी घेवून हे हद्दपारीचे आदेश दिल्याचे रोह्याचे तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी सुभाष भागडे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
रोहा तालुक्यातील तिघा गुंडांवर हद्दपारीची कारवाई
By admin | Published: October 08, 2016 2:08 AM