जीवन रामावत , नागपूरविदर्भातील केवळ शेतकरीच कर्जबाजारी नसून, कृषी विभागाच्या डोक्यावरसुद्धा कोट्यवधीच्या थकबाकीचे ओझे असल्याची माहिती आहे. नागपूर विभागातील बहुतांश कृषी कार्यालये भाड्याच्या जागेत सुरू आहेत. मात्र असे असताना कृषी विभागाने काही वर्षांपासून त्या इमारतींचे भाडेच दिलेले नाही; शिवाय नगरपालिकांचा करसुद्धा भरलेला नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या डोक्यावर सुमारे १ कोटी २० लाखांपेक्षा अधिकची थकबाकी झाली आहे.काही नगरपालिकांनी आपल्या करवसुलीसाठी थेट कृषी विभागाला नोटीस बजावली असून, काही कार्यालयांवर जप्तीची टांगती तलवार असल्याचे सांगितले जाते. यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कृषी सहसंचालक कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. विशेष म्हणजे, नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयांतर्गत काटोल, उमरेड, रामटेक व नागपूर अशी ४ उपविभागीय कृषी कार्यालये असून, प्रत्येक तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालये आहेत; शिवाय काही ठिकाणी मंडळ कार्यालयेसुद्धा आहेत. यापैकी केवळ नागपूर, कामठी, बुटीबोरी, सावनेर व मौदा या पाचच ठिकाणी शासकीय इमारत असून, इतर सर्व कार्यालये भाड्याच्या घरात सुरू आहेत.
कृषी विभागावर थकबाकीचे ओझे!
By admin | Published: March 14, 2016 2:35 AM