मुंबई : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत ई -शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यासाठी समाजकल्याण विभागाने राज्यातील विद्यापीठांमध्ये सुरू असलेले अभ्यासक्रम आणि त्यांचे शुल्क याची माहिती एकत्रित करण्यास प्रारंभ केला आहे. परंतु मुंबई विद्यापीठाकडून समाज कल्याण विभागाला अभ्यासक्रमाच्या शुल्काची माहिती अद्यापपर्यंत देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यापीठ मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ई - स्कॉलरशिप अंतर्गत आॅनलाइन स्कॉलरशिप प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती, शिक्षण आणि परीक्षा शुल्क प्रदान करण्यात येते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात, तर शिक्षण व परीक्षा शुल्क महाविद्यालयात परस्पर जमा करण्यात येते. समाज कल्याण विभागाने गेल्या वर्षी राज्यातील मान्यताप्राप्त महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांचे संगणक प्रणालीवर मॅपिंग केलेले आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय ठरविण्यात आलेली शिक्षण आणि परीक्षा शुल्कची रक्कम थेट आॅनलाइन पद्धतीने महाविद्यालयांना देण्याबाबत समाजकल्याण विभागाचा विचार सुरु आहे.समाज कल्याण विभागाने विद्यापीठाला पत्र पाठवून मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी विद्यापीठाची राहील, असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी दिला आहे.
मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीबाबत विद्यापीठ उदासीन
By admin | Published: July 03, 2015 3:43 AM