मुंबई : ‘मला त्याने बर्थडेला बोलावले नाही, यासाठी कुणी दिवसभर अबोला धरते’, तर ‘आई-बाबांनी स्मार्टफोन घेतला नाही म्हणून चिडचिड करणे’, ‘फोटोला लाइक्स केले नाही कुणीच’, ‘बेस्ट फ्रेंडशी भाडण झाले म्हणून जेवतच नाही’ अशा छोट्या-छोट्या टप्प्यांतून भविष्यात लहानग्यांच्या वाट्याला नैराश्य-उदासीनता येते, असे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने एका सर्वेक्षणांती नोंदविले आहे.लहानग्यांमधील मनोविकारामध्ये प्रामुख्याने वर्तणुकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भीती इ. लक्षणे दिसून येतात. लहान मुलेही अनेक वेळा निराश झालेली असतात, मात्र याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. यामुळे मुलांना अनेक मानसिक आजारांशी सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची उदासीनता लवकरात लवकर ओळखून त्यावर योग्य उपाय करावा, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संस्थेने यंदाचे वर्ष नैराश्याबद्दल जनजागृतीसाठी जाहीर केले आहे. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला जातो. उदासीनता ही अशी एक मानसिक अवस्था आहे, जी दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सुरू राहू शकते. मात्र यानंतर ती गंभीर रूपही धारण करू शकते. कोणतीही गोष्ट करायला कंटाळा करते. सतत नकारात्मक विचार मनात डोकावत राहतात. नेहमीचे आयुष्य कोलमडून जाते अशा अवस्थेत मुले असली तर ती दुसऱ्यांचे अधिक नुकसान करू शकतात. त्यातूनच मग ती आत्महत्येचा पर्याय निवडतात, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट यांनी सांगितले. साधारणत: महिन्याभरात उदासीनता असलेल्या १० ते २० टक्के लहानग्यांवर उपचार सुरू करावे लागतात, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती सांगळे यांनी दिली. (प्रतिनिधी)काय कराल?मुलांकडून अवास्तव अपेक्षा न बाळगता त्यांची क्षमता समजून घ्यावी. प्रत्येक वेळी ओरडून किंवा मारून सांगण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घ्याव्यात.मुलांचे म्हणणे ऐकून घ्यावे, प्रत्येक वेळी ते काय सांगताहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे.सतत त्यांना उपदेश करू नका किंवा प्रत्येक वेळी सल्ला देऊ नका. त्यांचा आत्मविश्वास सतत जागरूक ठेवा.कधीही आपल्या मुलाची इतर मुलांच्या बरोबर तुलना करू नका.उदासीनतेमागची कारणेआजकालची मुले अधिक प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. या तंत्रज्ञानावरच ती बऱ्याचदा अवलंबून असतात. कारण या सोशल नेटवर्किंग साइटवरून सतत एकमेकांशी चढाओढ करत असतात. सतत एकमेकांशी चढाओढ झाल्यामुळे आपण कुठे तरी कमी पडतो आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण होते आणि मुलांमध्ये आपोआपच डिप्रेशन येते. मुले मानसिक आजाराला बळी पडण्याचे मोठे कारण म्हणजे मुलं जेव्हा पालकांना काही तरी सांगत असतात, तेव्हा पालक त्यांचे काहीही ऐकून घेत नाहीत. त्यांच्या शाळेत काय घडते हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे.आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. कधी कधी पालक आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा करतात, म्हणजे आपली पूर्ण न झालेली स्वप्ने ते मुलांमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या दडपणाखाली मुले सतत आल्याने ती डिप्रेशनमध्ये जातात.आजकाल आई-वडील दोघंही नोकरी करत असल्यामुळे त्यांचे कित्येक तास घराबाहेरच जातात. त्यामुळे मुलांना आई-वडिलांसोबत वेळ मिळत नाही.
लहानग्यांमध्येही वाढतेय उदासीनता
By admin | Published: April 07, 2017 1:57 AM