खानापूर (जि. अकोला) : पातूर तालुक्यातील आस्टुल येथे एका शेतकरी कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याप्रकरणी आतापर्यंतच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली असता, नैराश्यातून वडिलांच्या हातून हे हत्याकांड घडले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संजय इंगळे (४५), त्यांची पत्नी मनीषा (३५), मुलगी ऐश्वर्या (१९), मयूरी (१७) आणि मुलगा रोशन (१५) यांचे मृतदेह पातूर तालुक्यातील आस्टुल येथे २१ एप्रिल रोजी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. संजय इंगळे हे आस्टुल गावातील प्रतिष्ठित. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ३० एकर बागायती शेती होती; मात्र ही शेती त्यांच्या नावे नव्हती. घरात वीज नव्हती़ एवढंच काय, झोपण्यासाठी घरात पलंगही नाही. पोलिसांनी त्यांचे बॅँक खाते तपासले असता, खात्यात केवळ एक हजार रुपये होते. त्यांच्या दोन्ही मुली लग्नाच्या होत्या; मात्र हातात पैसा नाही. शेती नावावर नसताना मुलींच्या लग्न करायचे कसे, या विवंचनेत ते होते. त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती. या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. गावातून हातउसणे घेतलेले पैसे त्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी परत केले होते.दरम्यान, दोन मुलींचा गळा आवळल्याने व उर्वरित तिघांचा अर्थात पती-पत्नी व मुलगा यांचा मृत्यू गळफास लागल्याने झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. पाचही मृतदेहांवर जखमांच्या खुणा नाहीत. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस गुन्ह्यात पुढील कलमांची वाढ करणार आहेत. (वार्ताहर)
नैराश्यापोटी वडिलांनीच घेतला अपत्यांचा जीव !
By admin | Published: April 26, 2015 1:55 AM