ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7- आपल्या दबंग कारवाईमुळे प्रसिद्धी असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती करण्यात येणार आहे. बिहारमधील स्पेशल फोर्स टास्कमध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या लांडे यांनी काही महिन्यांपूर्वी प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात येण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घेत, गृहविभागाला प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. यानंतर गृह मंत्रालयाने लांडे यांच्या महाराष्ट्रातील प्रतिनियुक्तीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता तीन वर्षांसाठी शिवदीप लांडे महाराष्ट्रात येणार आहेत.
शिवदीप लांडे हे 2006 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने त्यांनी बिहारमधील गुंड, माफियांमध्ये स्वतःची दहशत निर्माण करत गुन्हेगारीवर चाप लावला आहे. विशिष्ट काम करण्याच्या पद्धतीमुळे ते 'दबंग' शिवदीप लांडे म्हणून ओळखले जातात. शिवदीप लांडे हे राज्यातील जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. शिवदीप लांडे यांनी राज्यातील दहशतवादविरोधी पथक किंवा गुन्हे अन्वेषण विभागात काम करावे, अशी इच्छा काही दिवसांपूर्वी शिवतारे यांनी बोलूनही दाखवली होती. त्यामुळे आता राज्यात शिवदीप लांडे यांची कुठे वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.