गृह विलगीकरण काळातही उपमुख्यमंत्री 'अॅक्टिव्ह' ; 'हा' फॉर्म्युला वापरून कामाचा धडाका सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 11:53 AM2020-10-23T11:53:22+5:302020-10-23T12:06:32+5:30
अजित पवार हे ग्राऊंड वर काम करणारे मंत्री म्हणून प्रचलित आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे ग्राऊंड लेव्हलला काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. अगदी कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून ते अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा पाहणी करण्यापर्यंत त्यांनी ग्राऊंड लेव्हलला काम करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक सुरक्षिततेच्या कारणामुळे गृह विलगीकरणात असताना देखील पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आपल्या कामकाजाचा धडाका सुरूच ठेवला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्याहून परतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थोडी कणकण, थंडी, ताप जाणवू लागल्यामुळे आणि सध्या कोरोनाची साथ असल्यामुळे काळजी घेत होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. तसेच तातडीने त्यांनी आपली कोरोना टेस्ट सुद्धा करून घेतली. ती निगेटिव्ह आली. तरीदेखील त्यांनी गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला.परंतू , या काळात देखील उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच आहे.
अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून तब्येत अस्वस्थतेमुळे मुंबई येथील आपल्या देवगिरी या निवासस्थानी गृह विलगीकरणात आहे. या काळात सुद्धा त्यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. आणि विशेष म्हणजे स्वत: अजित पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यालयीन कामकाजात सहभागी होत असल्याची माहिती आहे. महत्वाच्या विविध बैठकांना त्यांनी याप्रकारे हजेरी लावली आहे.
उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. शासकीय नस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.