राज्यावरील कोरोना संकट आता गडद होऊ लागले असून राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यात सध्या शिवसेनेत बंडाचे वादळ आले आहे. यातच राज्यातील महनिय व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना कोरोना झाल्याने त्यांना रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना रविवारीच सोडण्यात आले आहे.
राज्यपाल कोरोना बाधित असल्याची बातमी धडकते न धडकते तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कोरोना बाधित असल्याची बातमी धडकली होती. यानंतर ठाकरे यांनी बंडखोरीमुळे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्री गाठले होते. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली.
आज अजित पवारांनी ट्विट करून कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली. काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पवारांनी केले आहे.