पुणे – राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जात होता. परंतु दिवाळीनिमित्त पवार कुटुंबाचे मनोमिलन सर्वांना पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील स्नेहभोजन, त्यानंतर पाडवा आणि भाऊबीज पवार कुटुंबियांनी एकत्रित साजरी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी भाऊबीज साजरी केली आहे.
अजित पवारांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी सुप्रिया सुळेंसह सर्व बहिणी जमल्या होत्या. यावेळी सर्व बहिणींनी मिळून अजित पवारांना ओवाळलं, या क्षणी सर्वजण आनंदात दिसत होते. अजित पवारांसह त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनाही बहिणींनी ओवळलं. या क्षणाचे व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटला पोस्ट केलेत. त्यामुळे भलेही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय दुरावा आला असला तरी कौटुंबिक जिव्हाळा आजही कायम असल्याचं पाहायला मिळते.
शरद पवार आणि अजित पवार हे कौटुंबिक सोहळ्यात एकत्र येत असल्याने त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. अनेकांनी शरद पवार-अजितदादा भेटीवर शंका व्यक्त केली. त्यात सुरुवातीच्या या भेटीवर संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार आणि अजित पवार भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण जाते. भगवतगीतेत श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे युद्धावेळी नाती पाहिली जात नाही. तिथे फक्त शस्त्रे असतात. इथं कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात आक्रमक वागायचे आणि तिकडे तुम्ही कौटुंबिक स्नेहभोजनासाठी एकत्रित येणार हे असे चालत नाही असं राऊतांनी म्हटलं होते.
तर कितीही मतभेद झाले तरी सणासुदीला एकत्र येणे हेच पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. मतभेदानंतर पवार कुटुंब वेगळे होते. पण अशा कार्यक्रमाला नक्की एकत्र येतात. पवार कुटुंब एकत्रित आले म्हणून मागचे मतभेद विसरले असे नाही. मतभेद अजूनही तसेच आहेत. अजित पवार गोविंद बागेत जाणारच असतात. ते जातात. दोन मोठे पवार जे आहेत अजित पवार आणि शरद पवार त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे घटना घडल्याशिवाय कळत नाही, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.