पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशाचा कारभार चालवतात. मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्राचा कारभार चालवला तर, विरोधकांनी मुख्यमंत्र्यावर टीका का करावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला. शनिवारी पंढरपूर दौऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
हजारो कोटी रुपये खर्च करून जलयुक्त शिवार योजना राबवली गेली. कॅगनेच या योजनेबाबत मुद्दे उपस्थित केले आहेत. तसेच कॅगद्वारेच याची चौकशी होत आहे. त्यामुळे कुणाची आकसापोटी चौकशी करण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून होत नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याचेही ते म्हणाले.
कोरोना बाधित रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. तसेच बरे होऊन जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. पुरेसा औषधसाठा असल्याचेही पवार म्हणाले.