"आधी रेटून बोलायचो, पण भाऊ सोबत नाहीये म्हणून..."; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 18:17 IST2025-02-15T18:07:41+5:302025-02-15T18:17:42+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझा भाऊ सोबत नसल्याचे खंत व्यक्त केली आहे.

"आधी रेटून बोलायचो, पण भाऊ सोबत नाहीये म्हणून..."; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
Ajit Pawar on Shrinivas Pawar:राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार कुटुंबातही मोठी फूट पडली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली. निवडणुकीचा प्रचारादरम्यान पवार कुटुंबीयांनी एकमेकांवर जोरदार टीका देखील केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझा भाऊ सोबत नसल्याचे खंत व्यक्त केली आहे. माझा भाऊ सोबत नाही हे दबकत म्हणतोय असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात तगडी लढत झाली होती. यावेळी युगेंद्र पवार यांचे वडील आणि अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावरूनच आता भाऊ सोबत नसल्याची खंत अजित पवार यांनी जालन्यात बोलताना व्यक्त केली आहे.
"स्वतःच्या घरात काय जळतय ते पहिलं बघितलं पाहिजे. तरच दुसऱ्याचे घर तुम्ही शाबूत ठेवू शकता. आमच्यातले काय काय पुढारी असे आहेत की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्याबरोबर नाहीत आणि बाकी त्यांना उपदेश देत बसतात. मी तर रेटून बोलायचो. पण आता दबकत दबकत बोलतोय. कारण माझा भाऊ माझ्याबरोबर नाही. ठीक आहे काम चांगलं करा ही भर आपण दुसरीकडून भरून काढू," असं अजित पवार म्हणाले.
आठ दिवसांत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार
जालन्यातल्या कार्यक्रमात बोलताना लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आठ दिवसांत मिळणार असल्याचे अजित पवार म्हणाले. "लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आमच्यावर टीका करण्यात आल्या. आज देखील सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. हे सर्व राज्य सरकार ठरवेल. तुम्हाला कोणी अधिकार दिलाय. राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही पावले उचलतोय. कालच मी इथं परतूर मठाला येत असताना ३५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही केली. आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. दिलेला शब्द पाळणारे आहोत. परंतु दिलेल्या योजनेचा फायदा पण तुम्ही नीट केला पाहिजे," असं अजित पवार म्हणाले.