'चांगल्या रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करायला हवे'; अजित पवार केतकीवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:55 PM2022-05-14T18:55:26+5:302022-05-14T18:55:51+5:30
ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून केतकी चितळे हिला ताब्यात घेतलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनीकेतकी चितळे विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून केतकी चितळे हिला ताब्यात घेतलं आहे.
केतकी चितळेला ताब्यात घेतल्याबद्दल ठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन आभार, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. अभिनेत्री केतकी चितळे हीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक स्तरांतून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे.
केतकी चितळेच्या या आक्षेपार्ह विधानानंतर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील टीका केली आहे. विरोधी पक्षातील नेते असेल किंवा अन्य कुणीही असेल, त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करु नये, मी याचा निषेध करतो. तसेच अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांना मनोरुग्णच म्हणावं लागेल, त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. चांगल्या रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
चोप दिल्यानंतरच मनाला शांती मिळेल- रुपाली पाटील
मला वाटतं ती मानसिक रुग्ण आहे. आपलं वय काय आणि आपण बोलतो काय याचा जरा विचार करायला हवा. तिनं ज्या पद्धतीनं पोस्ट केली आहे. त्याच पद्धतीनं तिला प्रतिक्रिया देखील मिळत आहेत. मला वाटतं तिला आता चोप देण्याची वेळ आली आहे. कारण तिच्यावर संस्कार काही व्यवस्थित झालेले दिसत नाहीत. त्यामुळे छडी लागे छमछम विद्या येई घमघम असं म्हणतात. त्यामुळे छडीनं चोप देणं गरजेचं आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील म्हणाल्या.
नेमकं प्रकरण काय?-
केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबाबत आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीनं शरद पवार यांच्या आजारावरून टीका केली होती. तिनं आपल्या फेसबुकवर शेअर केलेल्या कवितेच्या खाली तिनं अॅडव्होकेट नितीन भावे असं नावंही दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसंच अनेकांनी तिच्या या पोस्टवर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, यावरून यानंतर तिच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.