चांदखेड (जि. पुणे) : कासारसाई धरणामध्ये मत्स्य व्यवसाय प्रकल्पाला भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. ते ज्या तराफ्यात बसले होते त्याला जादा लोड झाल्याने तो बंद पडला आणि पवार पाण्यात मधोमध अडकून पडले. त्यानंतर दुसऱ्या बोटीच्या साहाय्याने पवारांनी प्रकल्पाची पाहणी केली.
कासारसाई धरणामध्ये वेदिका फार्म म्हणून आधुनिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय केला जातो. त्याची पाहणी करण्यासाठी पवार शुक्रवारी पहाटे सहा वाजता आले होते. धरणाच्या मध्यभागी प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे. तेथे जाण्यासाठी तराफा तसेच बोटीने जावे लागते; परंतु संबंधित मालकाने तराफ्याने जाण्याचे नियोजन केले. तराफ्यामध्ये अधिकची गर्दी करू नका म्हणून अजित पवारांनी तंबी दिली होती; परंतु पवार तराफ्यावर बसले आणि त्यानंतर मागून अधिकच्या काहींनी गर्दी केली. परिणामी, जास्त गर्दीमुळे तराफ्याचे इंजिन बंद पडले.