उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 'लय भारी' निर्णय; राज्यातील जुन्या वृक्षांना आता ‘हेरिटेज’चा दर्जा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:13 AM2020-08-26T11:13:23+5:302020-08-26T11:41:12+5:30
राज्यातील आता जुन्या वृक्षांना संरक्षण मिळणार
पुणे : राज्यातील आता जुन्या वृक्षांना संरक्षण मिळणार असून, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ते ‘हेरिटेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. तसेच राज्यात कमी वेळेत ‘घनवन’ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकार राज्यात जुन्या वृक्षांची माहिती संकलित केली जात आहे. त्यांची या संदर्भात आज बैठक झाली.
जुन्या वृक्षांना ‘हेरिटेज’ घोषित करावे, यासाठी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर कर्वेनगर येथील त्रिशतकवीर वडाचे झाड, गोगलवाडी येथील अडीचशे वर्षांचे नांदु्रकचे झाड या विषयी देखील वृत्त दिले होते.
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’निमित्त राज्यात ७५ विशेष ‘रोपवाटिकां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून, शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या मदतीने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालनाही देण्यात येणार आहे.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’च्या वृक्षलागवडीसंदर्भातील विविध विषयांवर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. यावेळी वनमंत्री संजय राठोड, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक दिनेश त्यागी, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक विवेक खांडेकर उपस्थित होते.
जिल्हानिहाय वृक्षसंमेलन होणार
निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वन विभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.