"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील", देवेंद्र फडणवीसांनी वाचाळविरांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 07:10 PM2023-07-24T19:10:48+5:302023-07-24T19:11:23+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी काळात अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत विरोधकांना टोला लगावला. कुठल्याही पक्षातील लोकांना वाटते की, आपल्या पक्षातील नेता मुख्यमंत्री व्हावा यात वावगे काही नाही. राष्ट्रवादीतल्यांना वाटू शकते की अजितदादा झाले पाहिजेत. आमच्या पक्षातील लोकांनाही वाटू शकते की भाजपाचा मुख्यमंत्री व्हायला हवा. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी आज अधिकृतपणे महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो की, महायुतीचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेंच राहणार आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. याबद्दल अजित पवार आणि मला चांगली कल्पना आहे, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाची कोणती चर्चा देखील नाही आणि जे महायुतीतील लोक असं बोलत आहेत त्यांनी संभ्रम करणं टाळावं, असे फडणवीसांनी सांगितले.
तसेच पृथ्वीराज चव्हाण जे काही बोलले आहेत, अशा प्रकारची पतंगबाजी अनेकजण करत आहेत. त्यांनी कितीही भविष्यवाणी सांगून संभ्रम निर्माण केला तरी १०, ११ तारखेला आणि ९ तारखेला देखील काहीही होणार नाही. झाला तर विस्तारच होईल आणि तो विस्तार मुख्यमंत्री ठरवतील तेव्हा होईल. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच राहतील, अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते माध्यमांशी बोलत होते.
"महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील"
तिन्ही पक्षातील वाद टाळण्यासाठी समन्वय समिती वाचाळविरांची कानघडणी करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले, "मला वाटते की, माझे हे वक्तव्य म्हणजे समजणाऱ्याला इशारा पुरेसा आहे. सर्वच जण समजूतदार असून त्यांना इशारा मिळाला आहे. कोणाला असे वाटावे यात गैर काही नाही. पण बोलताना प्रत्येकाने वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे आणि वास्तव हे आहे की, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील."
निधी वाटपावरून मविआला टोला
"मी विधानपरिषदेत देखील सांगितलं की, आता जे शहाणपण शिकवत आहेत त्यांनी अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे शहाणपण त्यांनी त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिकवायला हवं होतं. भाजपा आणि सोबतच्या आमदारांना त्यांनी जराही निधी दिला नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांना निधी देणार नाही. मी यादी दाखवू शकतो विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळाला आहे. त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारावं या मताचे आम्ही नाही", अशा शब्दांत फडणवीसांना मविआला टोला लगावला.