वर्धा: दिड महिन्यांपूर्वी राज्यात शिंदे-फडणीस सरकार स्थापन झाले. सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता, तो कसाबसा झाला. पण, आता खातेवाटपारुन घोडं अडलं आहे. यामुळे विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. खातेवाटप झालं नसल्याने राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप सरकारवर होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.
देवेंद्र फडणवीस सध्या वर्धा दौऱ्यावर असून, यावळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "काळजी करू नका, खातेवाटप लवकरच होणार आहे. तुम्हाला लवकर याची माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खातेवाटप करत आहात. आम्ही पेपर फोडला, तर तुम्हाला काम मिळणार नाही,'' अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
'उद्धव ठाकरेंनी फक्त अहंकारासाठी...' यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडवरही भाष्य केले. ''कांजूरमारची जागा मेट्रो 3 साठी योग्य नाही हे आमच्या काळातील कमिटीने आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांच्या उच्चस्तरीय समितीनेही स्पष्ट अहवाल दिला होता की, कारशेड आरेमध्येच योग्य आहे. ते कांजूरमार्गमध्ये नेलं, तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षांचा उशीर होईल. पण, मला असं वाटतंय उद्धव ठाकरेंनी फक्त अहंकारासाठी कांजुरमार्गाचा आग्रह धरला. मेट्रो कार शेडसाठी आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही,'' असंही फडणवीस म्हणाले.
'17 ऑगस्टपूर्वीच खातेवाटप होणार'राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता 17 ऑगस्टपासून विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच मंत्र्यांचे खाते वाटप होईल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे व्यक्त केला. यासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत व सिंचनासह रस्ते, वीज, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.