मुंबई - मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन झालेला सत्तासंघर्ष राज्याने पाहिला. भाजपा आणि शिवसेना या मित्रपक्षांनी एकत्र निवडणूक लढवली, मात्र मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षात तिढा निर्माण झाला. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही राहिली पण भाजपाने मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपाकडे सर्वाधिक जागा असूनही त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी नवी महाराष्ट्र विकास आघाडी अस्तित्वात आली, सत्तेत विराजमान झाली. अगदीच अनपेक्षितपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्रिपद हे राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं पद मानलं जातं. हे पद मिळविण्यासाठी अनेक नेते इच्छुक असतात. काही नशीबवान मंडळींना ते अचानक मिळून जातं, तर काहींचं स्वप्न स्वप्नच राहतं. महाराष्ट्राच्या राजकारणातही मुख्यमंत्रिपदाची 'लॉटरी' लागलेले काही नेते आहेत, तर हे सिंहासन थोडक्यात हुकलेल्या मंडळींची संख्याही बरीच आहे. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांचं मंत्रिपद मिळालेले नेतेही राज्यात पाहायला मिळतात. नारायण राणे, अशोक चव्हाण हे दोन नेते आधी मुख्यमंत्री होते आणि नंतर त्यांना महत्त्वाची खातीही मिळाली. पण, राज्यातील उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेला नेता आजपर्यंत मुख्यमंत्र्याच्या सिंहासनावर विराजमान होऊ शकलेला नाही. त्यामुळेच मोठं स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांसाठी हे पद जरा जोखमीचंच मानलं जातं.
१९७८ मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना नाशिकराव तिरपुडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. शरद पवार मुख्यमंत्री असताना सुंदरराव साळुंखे उपमुख्यमंत्री होते. १९८३ ते ८५ या काळात रामराव आदिक, १९९५ ते ९९ भाजपाचे गोपीनाथ मुंडे, १९९९ ते २००३ दरम्यान छगन भुजबळ, २००३-०४ मध्ये विजयसिंह मोहिते पाटील, २००४ ते २००८ दरम्यान आर.आर पाटील, पुन्हा २००८ ते २०१० मध्ये छगन भुजबळ, त्यानंतर २०१०-१४ मध्ये अजित पवार यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं. अलीकडेच साडेतीन दिवसांसाठी आणि आता महाविकास आघाडी सरकारच्या विस्तारात पुन्हा अजितदादांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
आजवरची परंपरा किंवा इतिहास पाहिला तर उपमुख्यमंत्री झालेले नेते मंत्री झालेत, पण मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 'किंगमेकर'ची भूमिका अनेकदा पार पाडली असली, तरी या 'पॉवरफुल्ल' पक्षाचा कुठलाही नेता अद्याप महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला नाही. मागे एकदा त्यांना तशी संधी होती. परंतु, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा 'काटेरी मुकूट' काँग्रेसच्या शिरावर ठेवला होता.
राजकारणातील योगायोग म्हणा अथवा आणखी काही, पण उपमुख्यमंत्रिपद जरा रिस्कीच आहे, हे नक्की! त्यामुळे या परंपरेला अजित पवार छेद देणार का, नवा इतिहास रचणार का, की ही परंपरा अशीच सुरू राहणार, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.