पुरातत्व विभागाच्या कामावर उपमुख्यमंत्र्यांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 04:33 PM2022-05-21T16:33:46+5:302022-05-21T16:34:22+5:30
Ajit Pawar : शिवनेरी किंवा अन्य गडकिल्ल्यांची कामे पहा, असा सल्लादेखील पवार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
सिंदखेडराजा : पुरातत्व विभागाच्या कामात सुबकता हवी, जुन्या पद्धतीची कामे त्याच पद्धतीने डिझाईन केली जावी, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करताना दिले. राजवाड्यातील दुरुस्तीचे काम पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवनेरी किंवा अन्य गडकिल्ल्यांची कामे पहा, असा सल्लादेखील पवार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बहुचर्चित सिंदखेडराजा दौरा २१ मे रोजी पार पडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी सहा महिन्यांपूर्वी येथे येऊन पुरातन वास्तूंची पाहणी केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी शनिवारी सिंदखेडराजाचा दौरा केला. शनिवारी सकाळी ९:३० वाजता ते शहरात पोहोचले. राजवाड्यात जाऊन त्यांनी माँसाहेब जिजाऊंचे दर्शन घेत शहरातील सावकार वाडा, काळ कोट, त्यातील वस्तू संग्रहालयाची इमारत, रंग महाल, नीलकंठेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, राजे लखुजीराव जाधव यांची समाधी, पुतळा बारव येथे अत्यंत बारकाईने पाहणी करत कामाची गुणवत्ता राखण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. सोबतच ऐतिहासिक वास्तूत काय सुधारणा आवश्यक आहे, हेही पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, नियोजन मंडळाचे सदस्य ॲड. नाझेर काझी, एसडीओ भूषण अहिरे, नगराध्यक्ष सतीश तायडे, तहसीलदार सुनील सावंत, पुरातत्व विभागाच्या जया वाहने, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व अन्य उपस्थित होते. शहरातील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्याची पाहणी करताना तेथील कामाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रत्येक स्थळाला भेट देताना त्या स्थळाचे महत्त्व, ऐतिहासिक व पौराणिक माहितीही त्यांनी जाणून घेतली.